कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिल्याने, ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आता भाजपाकडू ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देखील ठाकरे सरकारवर या मुद्यावरून निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडी सरकारने अहंकारातून मेट्रो कारशेड कांजूरला हलवलं, तेंव्हाच त्यांनी प्रकल्पात मिठाचा खडा टाकला होता.आता न्यायालयाची स्थगिती, मुंबईकरांना आणखी किती काळ वाट बघायला लावणार हे सरकार?” असा प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारला केला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर दरेकर यांनी ट्विटद्वारे ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ज्यामध्ये ते म्हणातात की, “मला वाटतं पुन्हा एकदा हे सरकार तोंडावर आपटलेलं आहे. आरे कारशेड हलवू नये अशी मी वारंवार मागणी करत होतो. कारण, प्रकल्प लांबेल, अडचणी येतील. परंतु त्यांनी आपल्या अहमी स्वभावाने प्रकल्प हलवला आणि आज अपेक्षेप्रमाणे कोर्टाने फटकारलं की, जिल्हाधिकाऱ्याने सुनावणी न घेता जो निर्णय दिला होता, तो चुकीचा होता आणि आज त्याला स्थगिती दिली गेली आहे. आता हे किती महागात पडणार आहे. कारण, जर फेब्रुवारीपर्यंत स्थगिती असेल. तर वाढणारा प्रकल्पाचा खर्च कोण भरणार आहे? हा प्रकल्पाचा खर्च शेवटी जनतेच्या खिशातून जात असतो.”

मुंबई मेट्रो कारशेड : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले…

तसेच, “मला वाटतं एखादा प्रकल्प पूर्ण करायचा असेल, तर अशा प्रकारच्या ज्या अडचणीच्या गोष्टी असतील. तिथे मुद्दाम असं काही करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु सरकारला जनतेच्या हितापेक्षा, विकासापेक्षा, प्रकल्पापेक्षा भाजपाने तो प्रकल्प सुरू केला आहे. मग आपण तो स्थलांतरित करावा, नाव बदलावं उशीरा झाला तरी चालेल आपल्या मनानी करावं. अशा प्रकारच्या गोष्टीला चपराक देण्याचं काम न्यायालयाने केलेलं आहे. आता यातून तरी त्यांनी सुधारण्याची आवश्यकता आहे. मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा व मुंबईकरांना भेडसवणारा अशा वाहतूकीच्या प्रश्नावरची ही उपाययोजना आहे, त्यामुळे आता न्यायालयाच्या चपराकीनंतर तरी सरकारने सुधारण्याची आवश्यकता आहे.” असं देखील दरेकर यांनी म्हटलेलं आहे.

“गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”

तर, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला, “विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.