देशात आणि राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधितांच्या एकूण संख्येत भारतानं आता रशियालाही मागे टाकलं आहे. देशात आतापर्यंत एकूण सात लाखांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर मृतांची संख्याही २० हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्राकडे पाहिलं तर महाराष्ट्रातही करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाखांच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या धारावीतून मात्र दिलासादायक बाब समोर आली आहे. एकेकाळी मुंबईतील करोनाचं हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या धारावीतून मंगळवारी केवळ एकाच रुग्णाची नोंद झाली.

एक अशी वेळ होती जेव्हा धारावीला अनेकांकडून मुंबईतील वुहान असं म्हटलं जायचं. परंतु आता याच धारावीची सक्सेस स्टोरी सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे, मंगळवारी धारावी परसात केवळ एकाच करोनाबाधिताची नोंद झाली. त्यानंतर धारावीतील एकूण करोनाबाधितांची संख्या २ हजार ३३५ वर पोहोचली आहे.

दरम्यान, बुधवारी मुंबईत नव्या ७८५ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर करोनाबाधितांची एकूण संख्या ८६ हजार ५०९ वर पोहोचली. तक शहरात आतापर्यंत ५ हजार २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर मीरा-भाईंदरमध्ये ११ आणि पनवेलमध्ये ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती.