संघाच्या मुद्यावर खोडा आणि जागांचा तिढा कायम

भाजप-शिवसेनेच्या विरोधातील महाआघाडीत वंचित बहुजन आघाडील सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेसने पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत दीड तास खल होऊनही निवडणूक समझोत्याबाबत कोणत्याही निर्णय होऊ शकला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याचा खोडा आणि जागावाटपाचा तिढा कायम आहे.

मुंबईत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. बैठकीत संघाला घटनेच्या चौकटीत कसे आणायचे त्याचा मसुदा कसा व कुणी तयार करायाचा यावर चर्चा झाली. त्यानंतर जागावाटपावर वाटाघाटी झाल्या. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला काँग्रेसकडे १२ जागा मागितल्या होत्या. आजच्या बैठकीत वंचित आघाडीने आतापर्यंत २२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्याचे काय करायचे असा प्रश्न बैठकीत उपस्थित केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही अवाक झाले. संघ आणि जागावाटप यावर बराच खल झाला. परंतु कोणत्याही निर्णयाप्रत नेते येऊ शकले नाहीत. आजची चर्चा सकारात्मक झाली असून, महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा सुरू आहे, लवकरच त्यातून मार्ग निघेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

प्रचारात संघविरोध राहणार  – अशोक चव्हाण

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला संघाला घटनेच्या चौकटीत कसे आणणार, याबाबत मसुदा तयार करण्यासाठी तीनही पक्षांत चर्चा सुरू आहे, काँग्रेस संघाच्या विरोधात आहे आणि निवडणूक प्रचारातही हा मुद्दा राहणार, असे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.