गेल्या दहा वर्षांमधील दुर्घटना

जोरदार वारा आणि अग्निशमल दलाच्या शिडय़ा पोहोचण्यासाठी जागेची कमतरता यामुळे उंच इमारतींमधील आगीच्या दुर्घटना आटोक्यात आणणे कठीण होते. गेल्या दहा वर्षांत उंच इमारतींमध्ये तब्बल दीड हजारांहून अधिक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन दलाने माहिती अधिकारात उघड केले आहे.

शहरात दररोज १२ ते १५ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. यावर्षी  जुलै २०१८ पर्यंत शहरात तब्बल ४८,४३४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यापैकी ८७३७ घटनांमध्ये रहिवासी इमारतीत तर ३८३३ घटनांमध्ये व्यासायिक इमारतीत आग लागली. झोपडपट्टय़ांमध्ये ३१५१ वेळा आग लागली. यातील बहुतांश घटनांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. तब्बल ३२,५१६ घटनांमध्ये म्हणजेच ६७ टक्के वेळा शॉर्ट सर्किट कारणीभूत ठरले. १११६ घटनांमध्ये गॅस सिलिंडरमुळे आग लागली तर ११,८८९ घटनांमध्ये आगीमागे इतर कारणे होती. या सर्व घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांत ६०९ जणांचा मृत्यू झाला. त्यात २९ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ९० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, अशी माहिती शकील शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने माहिती अधिकारामध्ये दिली.

याअंतर्गत गेल्या दहा वर्षांत शहरातील तब्बल १५६८ उंच इमारतींमध्ये आगीच्या घटना घडल्याचे समोर आले. परिमंडळ तीनच्या हद्दीत सर्वाधिक ४९६ उंच इमारतींमध्ये आग लागली. आगीच्या एकूण घटनांच्या तुलनेत उंच इमारतींमधील आगीचे प्रमाण एक टक्का असले तरी या घटनांमुळे मालमत्ता तसेच जीविताचे अधिक नुकसान होत असल्याचे आढळून येते. अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आग लागलेल्या संबंधित ठिकाणी बंब, पाण्याचे टँकर पाठवले जातात. पाण्याचे जोरदार फवारे सोडून आग विझवण्याचे प्रयत्न होतात. मात्र उंच इमारतींमधील आग विझवण्यासाठी शिडय़ांचा वापर करावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये अग्निशमन दलात ९० मीटरपर्यंत म्हणजे ३०व्या मजल्यापर्यंत पोहोचणाऱ्या शिडय़ा दाखल केल्या आहेत. मात्र  शिडय़ा लावण्यासाठी मोकळी जागा नसल्याने बाहेरून आग विझवणे कठीण होते. त्यामुळे अग्निप्रतिबंधन अधिनियम २००६ची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी शकील शेख यांनी केली.