बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनात दीड हजार रुपयांची नाणी, तर १२ हजार रुपयांची रक्कम ही नोटांच्या स्वरुपात देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी परिपत्रक काढण्यात आले. ऊर्वरित वेतन बँक खात्यात जमा होईल. १५ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना वेतनातील ही रक्कम देण्यात येणार आहे.

भाडेकपातीनंतर बेस्टचे तिकीट दर पाच किलोमीटरसाठी ५ रुपये झाले. टाळेबंदीआधी बेस्टकडे मोठय़ा प्रमाणात नाणी जमा होत होती. यामुळे बेस्ट प्रशासनाने गेल्या काही महिन्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठराविक रक्कम नाण्याच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दर महिन्याला काही ठराविक रक्कम ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांमध्ये दिली जाते. मार्चपासून प्रवासी कमी झाले. मात्र आता प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती १६ लाखांपर्यंत पोहोचली. बेस्टकडे पुन्हा मोठय़ा प्रमाणात नाणी जमा होऊ लागली आहेत.