करोनामुळे काही सार्वजनिक गणेशमूर्तीचेही विसर्जन

मुंबई/ ठाणे:  ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण, ना फटाक्यांची आतषबाजी, ना भलीमोठी मिरवणूक.. करोनाच्या सावटामुळे शनिवारी अतिशय शांततेत भक्तांच्या घरी दाखल झालेल्या श्रीगणेशाला दीड दिवसाच्या आदरातिथ्यानंतर रविवारी निरोप देण्यात आला.

करोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले तर, मोठमोठी मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांनीदेखील यंदा दीड दिवसातच गणेशोत्सव आटोपता घेतला. ठाणे जिल्ह्य़ात तर यंदा प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सव्वा लाख गणेशमूर्तीपैकी ४० हजारांहून अधिक गणेशमूर्तीचे रविवारीच विसर्जन पार पडले.

गणेशोत्सव हा मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत एक सोहळा असतो. मात्र, यंदा करोनाच्या संकटाने या उत्सवाला झाकोळून टाकले आहे. टाळेबंदीमुळे नोकरदारापासून उद्योजकापर्यंत साऱ्यांवरच ओढवलेले आर्थिक संकट, करोनाची भीती आणि सरकारी र्निबध या कारणांमुळे यंदा गणेशोत्सवाचा डामडौलच दिसेनासा झाला आहे. अनेक कुटुंबे, गृहनिर्माण संस्था तसेच सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवच रद्द केला तर, उर्वरित भक्तांनीही अतिशय शांततेत आणि साध्या वातावरणातच शनिवारी गणरायाची प्रतिष्ठापना केली. रविवारी त्याच साधेपणाने दीड दिवसाच्या गणेशाला निरोपही देण्यात आला. दरवर्षी घरगुती गणेश विसर्जनालाही मुंबईतील समुद्रकिनारी हजारोंची गर्दी उसळते. यंदा मात्र, हे समुद्रकिनारे निवांत होते. समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरच बॅरिकेड लावून नागरिकांना येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूर्ती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडेच सुपूर्द कराव्या लागल्या.

महापालिका प्रशासनांनी वेगवेगळय़ा भागांत कृत्रिम तलावांची उभारणी करून तेथे विसर्जन करण्याच्या सूचना भाविकांना केल्या होत्या. तसेच या ठिकाणी जास्त वेळ थांबूही दिले जात नव्हते. अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असल्याने अशा हौदांवरही फारशी गर्दी नव्हती. त्यातही अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. यंदा अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जनही रविवारीच करण्यात आले. मुंबईत सायंकाळपर्यंत विसर्जन करण्यात आलेल्या ७९१५ मूर्तीपैकी १२३ सार्वजनिक मंडळांच्या होत्या. ठाणे जिल्ह्य़ात तर याहूनही थक्क करणारे चित्र दिसून आले. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये यंदा ९०१ सार्वजनिक तर १ लाख २१ हजार ४७८ घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यापैकी २६७ सार्वजनिक तर ३९ हजार ९५६ घरगुती गणेशमूर्तींचे रविवारी सायंकाळपर्यंत विसर्जन झाले. ही संख्या अन्य वर्षांच्या तुलनेत लक्षणीय आहे.

कोकणातून गणपतीचे ‘स्थलांतर’

कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी हमखास गावी जातो. मात्र, यंदा करोनाची भीती, प्रवासाच्या अडचणी आणि गावी गेल्यानंतर अलगीकरणाचे र्निबध या कारणांमुळे अनेकांना गावी जाणेच शक्य झाले नाही. त्यामुळे कोकणात जाऊन कुटुंबाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी यंदा गावातील घराऐवजी मुंबईतील घरीच गणपती आणण्याचा पर्याय निवडला. ‘चिपळूण येथील घरी दरवर्षी पाच दिवसांचा गणपती असतो. त्यासाठी सर्व भाऊ आणि आम्ही कुटुंबासह गावी जात असत. मात्र यंदा गावी जाण्याऐवजी मुंबईतील घरीच दीड दिवसाचा गणपती आणला,’ अशी माहिती जयंत झगडे यांनी दिली.

सोसायटीच्या आवारातच निरोप

गणेशोत्सवासंदर्भात आखण्यात आलेल्या कडक नियमावलीमुळे यंदा अनेक गृहनिर्माण संस्थांनी आवारातच विसर्जन व्यवस्था उभी करून गणरायाला निरोप दिला. तेथेही अंतर नियमांचे पालन करण्यावर भर देण्यात आला. मुंबई तसेच ठाणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांतील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी फिरती व्यवस्थाही उपलब्ध करून दिली होती. त्याचाही अनेकांनी लाभ घेतला.