मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात शनिवारी दीड दिवसांच्या गणपतींना भाविकांनी निरोप दिला. दुपारी चार वाजल्यापासूनच ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करीत निघालेल्या या मिरवणुकांमध्ये रात्री उशीरापर्यंत वाद्यांचा ढणढणाट सुरू होता.  मुंबईत रात्री नऊ वाजेपर्यंत ४७,७३४, तर ठाणे जिल्ह्यात ४६,२९२ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गुलालांची उधळण, ढोल-ताशाचा गजर आणि गणरायाचा जयजयकार करीत भाविका विसर्जनस्थळांच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे विसर्जनस्थळांकडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. भाविकांनी विसर्जनासाठी समुद्रात उतरू नये यासाठी पालिकेने समुद्रकिनाऱ्यांवर तराफे सज्ज ठेवले होते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पाखटांच्या हल्ल्याचे सावट होते. त्यामुळे यंदा पालिकेने विशेष तयारी केली होती. मुंबई आणि ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थापना केली होती. त्यालाही भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.