चौकडीकडून २९ लाखांचे सोने हस्तगत

जेद्दाहहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या उत्तर प्रदेशातील चार तरुणांना हवाई गुप्तचर विभागाने सोने तस्करीप्रकरणी शुक्रवारी अटक केली. या चौघांनी पेन, टोपी, पायजम्याची नाडी, पट्टय़ात दडवून सुमारे २९ लाख रुपये किमतीचे ९२७ ग्रॅम सोने आणले होते. अटकेतील तरुण वाहक (कॅरिअर) असून त्यांनी कमिशनपोटी एकाच व्यक्तीसाठी सोने वाहून आणल्याची बाब तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले.

महोम्मद रेहान, महोम्मद इश्तियाक, महोम्मद इसरार आणि फारुख इस्लाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ओमान एअरवेजच्या विमानाने हे चौघे शुक्रवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. संशयास्पद हालचालींमुळे त्यांना अडवून झाडाझडती घेण्यात आली. तेव्हा रेहानच्या पायजम्याच्या नाडीत सोने सापडले. पुढील तपासात त्यांच्याकडील पेन, दात घासण्यासाठी वापरात येणारी कडुलिंबाची जाडसर काडी (दातून) यातही सोन्याचे तुकडे दडविल्याचे स्पष्ट झाले. रेहानकडून एकूण ४०४ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. इसरारच्या टोपीच्या आतल्या बाजूस आणि चामडय़ाच्या पट्टय़ात सोन्याचे तुकडे आढळले. फारुखच्या टोपीत, तर इश्तियाकच्या पायजम्याच्या नाडीत सोने सापडले. याबाबत हवाई गुप्तचर विभाग अधिक तपास करीत आहे.

१६ लाखांची मेमरी कार्ड जप्त

दुबईहून भारतात आलेल्या सायका हुसेन या तरुणीकडून हवाई गुप्तचर विभागाने ४ जीबी व ८ जीबीची सुमारे १६ लाखांची मेमरी कार्ड हस्तगत केली. खाद्यपदार्थाच्या हवाबंद डब्यात दडवून हुसेनने ही कार्ड भारतात आणली होती. तिच्याविरोधात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात आले.