राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला असून या प्रकरणी एकाला अटक केली आहेत. बनावट ३० कंपन्या स्थापन करून त्याद्वारे राज्याचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.  हा आकडा तूर्तास १८५ कोटींचा असला तरी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी दिलीपकुमार रामगोपाल टिबरेवाल या व्यक्तीला मालाड येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना  ५ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मे. अगस्त ओव्हरसिज् प्रा. लि., मे. आर्यमन ग्लोबल प्रा. लि., या कंपन्यांचे संचालक तर मे. शगुन फायबर्स याचे मालक तसेच अन्य २७ कंपन्यांचे चालक असलेल्या टिबरेवाल यांनी आतापर्यंत प्रत्यक्ष माल न पुरविता २१०० कोटी रुपयांची विक्री चलने जारी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांमार्फत १८५ कोटी रुपयांची करपत  देऊ केली आहे.

वस्तू व सेवा कर विभागाच्या तपास विभागाच्या सहआयुक्तांना चौकशीदरम्यान माहिती मिळाली की, टिबरेवाल यांनी स्वत:च्या आणि कुटुंबीयांचा समावेश असलेल्या चार विविध कंपन्यांची वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत नोंदणी केली आहे. याशिवाय त्याने अन्य व्यक्तींच्या नावे आणखी २६ कंपन्यांची या कायद्याअंतर्गत नोंदणी केली आहे. या ३० कंपन्यांमार्फत टिबरेवाल यांनी २१०० कोटी रुपयांची बोगसे विक्री चलने जारी केल्याचे आढळून आले. या चलनांची तपासणी केली असता प्रत्यक्षात माल पुरविलेला नसतानाही १८५ कोटींची करपत विविध कंपन्यांना उपलब्ध करून दिल्याचे उघडकीस आले.

यामुळे राज्याचा महसूल बुडाल्याचे लक्षात आले. याबाबत सध्या चौकशी सुरू असून कोटय़वधी रुपयांचा हा घोटाळा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा रीतीने वस्तू व सेवा कराबाबत बनावट चलने जारी करण्यात आली आहेत का, याची चौकशी आता व्यापक प्रमाणात केली जाणार असल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर हा पहिलाच घोटाळा उघड झाल्याचेही या सूत्रांनी सांगितले.