बाळासाहेबांना आदरांजली म्हणून १८ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’वर फेसबुकच्या माध्यमातून झालेली टीका व त्यावरून पालघरमध्ये निर्माण झालेला गदारोळ शमत असतानाच पालघरमधीलच एका अल्पवयीन मुलाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. पालघर पोलिसांनी सावध पवित्रा घेत मुलाला अटक न करता केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले.
राज यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याची तक्रार मनसेच्या ठाणे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष भावेश यांनी पोलिसांत केली. त्यानंतर हा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध लावून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती नको म्हणूनच या वेळेस या मुलाला सध्यातरी केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पालघर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या मुलावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु या प्रकरणी नेमकी काय कारवाई करावी, याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. या मुलाने फेसबुकवर राज तसेच मराठी जनतेविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला असल्याची माहिती मनसेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष कुंदन संख्ये यांनी दिली.