भारतीय जनता पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देण्याचा लालकृष्ण अडवानी यांचा निर्णय क्लेशदायक असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए)महत्त्वाचा घटक पक्ष शिवसेनेने व्यक्त केली. 
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उभारणीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांचे योगदान अमूल्य असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
अडवानींशिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विचारच केला जाऊ शकत नाही. अडवानी यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
अडवानी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे मार्गदर्शन राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.