आभासी विश्वात नेणाऱ्या ‘एलएसडी’ या महागडय़ा अमलीपदार्थाच्या तस्करी, विक्रीप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्रीच्या डॉक्टर पतीला अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी रात्री वांद्रे येथून अटक केली. डॉ. रझा बोरहानी असे त्याचे नाव आहे.

डॉ. बोरहानी वांद्रे येथील ‘हवाईयन श्ॉक’ या ‘नाईट क्लब’मध्ये एलएसडीचे वितरण करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याच्याकडून टपाल तिकिटाच्या आकाराचे १५५१ एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. परदेशात तयार झालेल्या या साठय़ाची किंमत एक कोटी आठ लाख इतकी असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.

बॉलीवूड अभिनेत्री आणि सुपर मॉडेल टोरा खासगीर आणि ऑस्ट्रेलियाचा नागरिक असलेला बोरहानी पती-पत्नी आहेत. यावर्षी दोघांनी आसाम येथे गांजा या अमलीपदार्थावर आधारित औषध निर्मिती आणि कर्करोगासह, एपिलेप्सी, सीकलसेल अ‍ॅनिमिया या रोगांवरील नैसर्गिक उपचार पद्धतीच्या संशोधनासाठी कंपनी सुरू केली आहे. त्या कंपनीच्या आड बोरहानी एलएसडीची परदेशातून तस्करी करतो आणि मुंबई-गोवासह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये वितरित करतो, असा संशय पथकाला आहे. त्याच्या ग्राहकवर्गात बॉलीवूड, उद्योग, राजकारण क्षेत्रातील वलयांकित व्यक्तींचा समावेश असावा, असा संशय पथकाला आहे.

२००८ मध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्याने बोरहानीला पोलिसांनी देश सोडण्याचे आदेश बजावले होते. तेव्हा उच्च न्यायालयातून बोरहानीने दिलासा मिळवला होता. इतकी वर्षे त्याने भारतात कसे वास्तव्य केले, हे वास्तव्य अधिकृत आहे का, याचीही माहिती पथक घेणार आहे.