ग्रामविकास विभागातर्फे स्पर्धेचे आयोजन

मुंबई : ग्रामीण भागातील करोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, गावांच्या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर करोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांनी बुधवारी के ली.

करोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाईल.

याशिवाय करोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५१५) व तीस चौपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांची  विकासकामे मंजूर केली जाणार आहेत.

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने करोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करून त्यासाठी कार्यवाही पथक, करोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांचे पथक, ‘कोविड हेल्पलाइन’ पथक आणि लसीकरण पथक आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुश्रीफ यांनी  दिली.

होणार काय?

जी गावे करोनापासून पूर्णपणे मुुक्त असतील अशा गावांना ५० लाख तसेच ५० लाखांची विकास कामे असे एक कोटीचे बक्षीस देण्यात येणार असून या महिन्यापासून मार्च २०२२ पर्यंत ही स्पर्धा होईल.

गुणांकन कसे?

करोनामुक्त समिती, पथके, बाधितांचा संपर्क शोधून रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता, विलगीकरण व्यवस्था, प्रतिजन चाचणी सुविधा, रुग्णांसाठी वाहतूक सुविधा, बाधित शेतकऱ्यांच्या घरातील शेतमालाचा स्वयंसेवकांमार्फत पुरवठा, लसीकरण सुलभ होण्यासाठी योजना, करोनामुळे आधार हरपलेल्या कुटुंबातील सांभाळ, जनजागृती आदी २२ निकषांवर सहभागी गावांचे गुणांकन होईल.