अर्ज सादर करण्यास पालिके कडून आठवडय़ाची मुदतवाढ

मुंबई : लस तुटवडय़ाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने जागतिक पातळीवर स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवले होते. मात्र पालिकेच्या या आवाहनाला जागतिक कंपन्यांकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला आणखी एक आठवडा मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईमध्ये लसीकरण मोहीम झटपट पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालिकेने व्यवस्थापन केले आहे. करोना शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये १८६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये ७४ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र अपुऱ्या लस पुरवठय़ामुळे खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. तर अधूनमधून शासकीय आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील लसीकरण मोहिमेलाही फटका बसत आहे. लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी पालिकेने २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने गोंधळ उडत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेने जागतिक कंपन्यांकडून एक कोटी लस मात्रा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागविण्यात आले होते.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ मे, तर त्यावरील अर्जदारांच्या शंका आणि सूचना १६ मेपर्यंत स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र अद्याप जागतिक कंपन्यांकडून प्रतिसाद मिळू न शकल्याने आता पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज सादर करण्यासाठी एक आठवडय़ाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक कोटी लस खरेदीसाठी सादर होणारे अर्ज आता २५ मे रोजी विचारात घेण्यात येणार आहेत. त्याच दिवशी तातडीने त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोठय़ा संख्येने जागतिक कंपन्यांनी स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज सादर करावे म्हणून एक आठवडय़ाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– पी. वेलरासू, अतिरिक्त  महापालिका आयुक्त