पालिकेकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा

मुंबई : करोना प्रतिबंध लसीच्या तुटवड्याचा प्रशद्ब्रा निकालात काढण्यासाठी मुंबई महापालिकेने लसीच्या एक कोटी मात्रा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी  पालिकेने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवले आहेत. मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांपर्यंत लस पोहोचण्यासाठी पाच आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

मुंबईतील लोकसंख्या लक्षात घेऊन लसीकरण मोहीम जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी प्रशासनाने प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मात्र लसीचा अपुरा साठा उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत आहे. काही खासगी रुग्णालयांतील केंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्याने तेथील लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. तसेच अधूनमधून शासकीय व पालिकेच्या केंद्रांमधील लसीकरण मोहिमेला लस तुटवड्याचा फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईकरांसाठी लसीच्या एक कोटी मात्रा खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या प्रक्रियेसाठी दोन आठवड्याचा कालावधी लागेल. त्यानंतर पुरवठादाराला कार्यादेश देण्यात येईल. साधारण तीन ते पाच आठवड्यात मुंबईकरांपर्यंत लस पोहोचू शकेल, असा विश्वाास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मुंबईकरांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी एक कोटी लस खरेदी करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन मुंबईकरांपर्यंत लस पोहोचण्यास पाच आठवड्यांचा कालावधी लागेल. – पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त