मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणून राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले आहे. त्याबाबतचे पत्र महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले असून राज्य सरकारी गट – ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी ही माहिती दिली.

करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. राज्य सरकारच्या अखत्यारितील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला असून करोनाबाधितांवरील उपचारांसाठी आणि करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला एक दिवसाचे वेतन दिले आहे. तसेच सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून मे महिन्यातील एक दिवसाचे निवृत्तीवेतन संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा होईल, अशी माहिती संघटनेने दिली आहे.