मनोरी खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोन जणांवर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव चिंतामणी कोळी (३९) असे आहे, तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नरेश कोळी आहे.  शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मनोरी खाडीत चिंतामणी कोळी आणि नरेश कोळी हे मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करून परतत असताना त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघेही बोटीबाहेर फेकले गेले. ही घटना बाजूच्या बोटीतील अन्य लोकांनी पाहताच त्यांनी तात्काळ  दोघांना किनाऱ्यावर आणले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता चिंतामणी कोळी यांना मृत घोषित करण्यात आले.

मुंबईत ऊनसावलीचा खेळ

मुंबई : शनिवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यावर रविवारी मुंबईत ऊनसावलीचा खेळ सुरू होता. शहराच्या काही भागांत पावसाच्या केवळ हलक्या सरी आल्या. शहरातील अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने आधीच हटवला होता. सोमवारपासून पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.  पुढील पाच दिवसांत मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात पावसाच्या केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.