मुलुंड पूर्वेकडील नानीपाडा मार्गावरील एका दुकानावर सोमवारी सायंकाळी झाड कोसळून ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नानीपाडा मार्गावरील अपना बाजार फाटकाजवळील एक वृक्ष उन्मळून जवळच्या चप्पल विक्रेत्याच्या दुकानावर पडला. या दुर्घटनेत सदाशिव रघुनाथ सावंत (६५) यांचा मृत्यू झाला, तर सुनील सदाशिव परब (५४) आणि रमेश चव्हाण (२५) हे दोघे जखमी झाले. परब यांना वीर सावरकर रुग्णालयात, तर चव्हाण यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरात मुसळधार पावसामुळे सोमवारी वाकोला येथे झाड भिंतीवर कोसळून ती चौघांच्या अंगावर पडून मृत्यू झाला होता. यासंदर्भात पालिकेने जुन्या वृक्षांना त्वरीत हटवण्याबाबत कार्यवाही हाती घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.