भिवंडीत गुरुवारी मध्यरात्री चारमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  या इमारतीचा काही भाग बाजूच्या इमारतीवर पडल्याने त्या इमारतीत राहणा-या २० कुटुंबीयांनाही घर सोडावे लागले आहे.

गोकुळनगरमधील समता सोसायटी परिसरात सूर्यराव ही ४० वर्ष जुनी इमारत होती. गुरुवारी रात्री उशीरा ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत एक जण ढिगा-याखाली अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ढिगारा उपसण्याचे काम सुरु केले. काही वेळाने त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सूर्यराव इमारत कोसळल्याने भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीत पावसाळ्यादरम्यानही इमारत कोसळण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जीवितहानीचे प्रमाणही जास्त होते.

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये ३३३५ इमारती धोकादायक असून ९० इमारती अति धोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. कल्याणमध्ये हा आकडा ३५७ तर भिवंडीत २१६ अति धोकादायक इमारती आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमधील धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्याचा आग्रह धरला जात असला तरी रहिवाशांकडून याला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे  सरकारी अधिका-यांनी सांगितले.