आवक कमी झाल्याने महागाई

मुंबई : गेले आठवडाभर पडत असलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसत असताना आता याचा फटका जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ावरही दिसू लागला आहे. मुंबई, ठाणे परिसरातील अंडय़ांचा पुरवठा कमी झाल्याने अंडय़ांच्या दरात नगामागे दीड ते दोन रुपयांची वाढ झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी ४८ रुपये डझन या दराने मिळणारी अंडी आता ६५ ते ७२ रुपये डझन या दराने विकली जात आहेत.

गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. या खोळंब्यामुळे मुंबईबाहेरून अंडय़ांची आवक कमी झाली. त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक अंडी विक्रेत्यांकडेच माल कमी येत असल्याने त्यांनी दरांमध्ये वाढ केली आहे. परिणामी किरकोळ व्यापाऱ्यांनीदेखील अंडय़ांच्या दरात नगामागे एक ते दीड रुपयाची वाढ केल्याचे चित्र आहे. विरार आणि पालघर जिल्ह्य़ांना पावसाचा तडाखा बसल्याने त्या भागातून होणारी अंडय़ांच्या मालाची वाहतूक घटल्याची माहिती घाऊक अंडी विक्रेते मनोज पांडे यांनी दिली. त्यामुळे पूर्वी घाऊक बाजारांमध्ये तीन ते साडेतीन रुपयांना मिळणाऱ्या एका अंडय़ाचा दर आता साडेचार रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र येत्या काही दिवसांमध्ये मालाची वाहतूक सुरळीत झाल्यावर अंडय़ांच्या दरांमध्ये घट होणार असल्याचे पांडे म्हणाले.

किरकोळ बाजारातही अंडय़ांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी साडेचार ते पाच रुपयांना मिळणारे एक अंडे साडेपाच ते सहा रुपयांना विकले जात आहे. मुंबईतील काही ठिकाणी अंडय़ांचा दर ७० ते ७२ रुपये डझन असल्याचे निदर्शनास येत आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी दरवाढ केल्याने किरकोळ बाजारातही दरांत वाढ झाल्याची माहिती अंडी विक्रेते सुरेश कदम यांनी दिली.