News Flash

‘बेस्ट’च्या ताफ्यात दीडशे दुमजली बसगाडय़ा

७० गाडय़ांचे आयुर्मान पूर्ण होत असल्याने टप्प्याटप्याने भंगारात; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपयोग

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० दुमजली बस (डबल डेकर) येणार आहेत.

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० दुमजली बस (डबल डेकर) येणार आहेत. सध्या असलेल्या १२० पैकी ७० बसचे आयुर्मान पूर्ण होत असल्याने टप्प्याटप्यात त्या भंगारात काढल्या जात आहेत. परंतु त्यानंतरही सेवेत राहणाऱ्या ५० बस आणि येणाऱ्या नविन १०० बसमुळे दुमजलीचा एकूण ताफा १५० पर्यंत पोहोचणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बेस्ट उपक्रमाच्या दुमजली बसगाडय़ा मुंबईच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच पर्यटकांच्याही त्या पसंतीस पडतात. या बसमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढते आणि गर्दीतला प्रवासही सुकर होतो. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या १२० दुमजली बसचे आयुर्मान संपल्याने त्या कालबाह्य़ होणार, अशी माहिती समोर येत होती. यातील ७० बसचेच आयुर्मान पूर्ण होत असून त्या टप्प्याटप्यात भंगारात काढल्या जात आहेत. त्यामुळे दुमजली जुन्या ५० बसच राहणार असून त्यांचे आयुर्मान संपण्यास आणखी तीन ते चार वर्ष आहेत.आयुर्मान संपुष्टात आलेल्या दुमजली बसऐवजी नवीन १०० दुमजली बस घेण्याचा निर्णय नुकताच बेस्ट उपक्रमाने घेतल्याचे स्पष्ट केले. या निविदा प्रक्रिया सुरू असून चार महिन्यांत त्या टप्प्याटप्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. १०० नव्या व जुन्या राहिलेल्या ५० बसगाडय़ांमुळे ही संख्या दीडशे होत आहे.

अत्याधुनिक सुविधा

  • भारत-६ श्रेणीतील या बसमध्ये स्वयंचलित गिअर
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्येच इलेक्ट्रॉनिक बोर्ड
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था

वातानुकूलित विद्युत बसगाडय़ा आजपासून

पर्यावरणस्नेही आणि वातानुकूलित २६ विद्युत बस शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता नरीमन पॉईट येथे होईल. यापूर्वी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विजेवरील स्वत:च्या मालकीच्या सहा आणि भाडेतत्त्वावरील ४० अशा एकूण ४६ बसगाडय़ा दाखल करण्यात आल्या आहेत. आता २६ मिडी बसही ताफ्यात असतील. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०० हून अधिक बस दाखल केल्या जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:26 am

Web Title: one fifty new double decker buses in best dd70
Next Stories
1 सागरी सेतूसाठीचा रस्ता तात्पुरता
2 चैत्यभूमीचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांवर
3 कारवाई टाळण्यासाठी पोलिसांशी हुज्जत, शिवीगाळ
Just Now!
X