बुधवारी मालाड येथे एक दुचाकीस्वार पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्याने जखमी झाला. त्याच्या गळ्याला १८ टाके घालण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी उद्याच्या मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडविताना होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
 बुधवारी मालाड येथे राहणारे रावसाहेब मोरे आपल्या मोटारसायकलवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावरून जात होते. वाकोला उड्डाणपुलावर अचानक एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. त्या धारदार मांज्यामुळे तोंडापासून गळ्यापर्यंतचा भाग कापला गेला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना एकूण १८ टाके घालण्यात आले.   
 मकरसंक्रांतीच्या सणात सर्वत्र पतंग उडविले जातात, परंतु पतंग उडविण्याच्या आणि तुटलेला पतंग पकडण्याच्या नादात अनेक दुर्घटना घडत असतात. रेल्वेच्या वायरीला पतंगाचा मांजा अडकून विद्युतप्रवाह खंडित होतो, पतंग पकडायला गेलेल्या मुलांना रेल्वेची धडक लागते किंवा उघडय़ा वायरींचा स्पर्श होऊन प्राणहानी होते. पतंग पकडणाऱ्या मुलांना त्याचे भान नसते. रेल्वे रुळालगतच्या वसाहतींमध्ये अशा घटना मोठय़ा प्रमाणात घडतात. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्या भागात गस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.चौपाटय़ा आणि मैदानात पतंग उडविण्यासाठी मोठी गर्दी जमते. तेथे विनयभंग, छेडछाड आणि सोनसाखळीचोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.