भेट देणाऱ्या नागरिकांना काँग्रेसकडून एक किलो कांदे मोफत

भाजप-शिवसेना सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रांच्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना एक किलो कांदे मोफत देण्याचा अभिनव कार्यक्रम काँग्रेसने येत्या सोमवारी म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केला आहे.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावळ, गिरीश बापट आदी मंत्र्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे किंवा गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. या साऱ्या प्रकरणांच्या कागदपत्रांचे प्रदर्शन मंत्रालयासमोरील काँग्रेसच्या गांधी भवन मुख्यालयात सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी एक किलो कांदे मोफत दिले जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले. कांदा उत्पादकांनी काँग्रेस पक्षाला कांद्याचा एक ट्रक देण्याचे मान्य केले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भाजप सरकारने वेळकाढूनपणाचे धोरण अवलंबिले आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांदे दिले जाणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.

मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना भ्रष्टाचार झालाच नाही, असा युक्तिवाद भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो. या संदर्भातील कागदपत्रे नागरिकांना पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.  कागदपत्रे बघितल्यावर नागरिकांचे तरी समाधान होईल, असा विश्वास विरोधी नेत्यांनी व्यक्त केला.