News Flash

अग्नितांडव!

दक्षिण आणि मध्य मुंबईत गुरुवारी सकाळी दोन झोपडपट्टय़ांना आग लागण्याच्या घटना घडल्या. वडाळा येथील न्यू कफ परेड परिसरातील आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,

| November 22, 2013 02:58 am

दक्षिण आणि मध्य मुंबईत गुरुवारी सकाळी दोन झोपडपट्टय़ांना आग लागण्याच्या घटना घडल्या. वडाळा येथील न्यू कफ परेड परिसरातील आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दक्षिण मुंबईतील कफ परेडच्या आंबेडकर झोपडपट्टीत एकाला प्राण गमवावे लागले.
गुरुवारी सकाळी १०.०० वाजता वडाळा आरटीओच्या शेजारच्या न्यू कफ परेडमधील लोढा कन्स्ट्रक्शनच्या कामगारांच्या झोपडय़ांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. बांधकाम मजुरांसाठी बांधण्यात आलेल्या ३० बाय ८० फूट लांबीच्या एकमजली झोपडय़ांमध्ये आग लागल्याने फर्निचर, घरगुती सामान जळून खाक झाले. सुरुवातीला ही आग एक नंबर वर्दीची होती. अग्निशमन दलाने आठ अग्निशमन गाडय़ा, पाण्याचे चार जंबो टॅंकर, दोन लहान टँकर, एक व्हॅन व एक रुग्णवाहिका पाठविली. दुपारी १२.००च्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली.
त्याचवेळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दक्षिण मुंबईत कफ परेडमध्ये बॅक बे आगाराच्या बाजूला असलेल्या आंबेडकर झोपडपट्टीत आग लागली. सुरुवातीला तीन अग्निशमन गाडय़ा तसेच दोन पाण्याचे टँकर पाठवण्यात आले. मात्र आग मोठी असल्याने दुपापर्यंत १६ गाडय़ा पाठवण्यात आल्या.
ही आग साडेतीन वाजता नियंत्रणात आणली गेली. यात एकाचा मृत्यू झाला. मात्र मृतदेहाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकलेली नाही. दोन्ही आगींमागील निश्चित कारण समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:58 am

Web Title: one killed several hutments gutted in mumbai fire mishaps
टॅग : Fire
Next Stories
1 सरकारी अनुदानातून ‘फुकट फौजदारां’ची तिकिटे!
2 महावितरणची २० हजार मीटर हॅक
3 मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ
Just Now!
X