करोना संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे देशभरातील बांधकाम उद्योगाला अंदाजे एक लाख कोटींचा फटका बसला असून हा उद्योग पुन्हा उभारी घेण्यासाठी दोनशे अब्ज इतक्या भरभक्कम आर्थिक साहाय्याची गरज असल्याचे मत ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’चे (नरेडको) अध्यक्ष डॉ. निरांजन हिरानंदानी यांनी वार्ताहर परिषदेत व्यक्त केले.

करोनामुळे ठप्प झालेल्या बांधकाम उद्योगापुढे खूपच मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच मंदीत असलेला हा उद्योग आता कुठे उभारी घेत असतानाच करोनाचे संकट आल्यामुळे पुरता हादरला आहे. करोनामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यांच्याकडे मोठी गुंतवणूक उपलब्ध असून डबघाईला आलेले बांधकाम उद्योग या परदेशी गुंतवणूकदारांकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने एखादा उद्योग दिवाळखोरीत काढला तर या परदेशी कंपन्या टपल्या आहेत. त्यामुळे लवादाच्या कामकाजाला सहा महिन्यांपर्यंत स्थगिती देण्याची आग्रही मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे डॉ. हिरानंदानी यांनी सांगितले.

२००८ मध्ये देशात जी मंदी होती त्यापेक्षाही कठीण परिस्थिती आज आहे. त्या वेळी रिझव्‍‌र्ह बँकेने वर्षभरासाठी पुनर्रचना योजना जारी केली होती. आताही त्याचीच तातडीने गरज आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, ज्याप्रमाणे क्रोसिन फक्त डोकेदुखी कमी करू शकते. कॅन्सरवरील उपचारांसाठी केमोथेरपीचीच गरज असते. बांधकाम उद्योगाला झालेला कॅन्सर दूर करण्यासाठी भरभक्कम उपायांचीच आवश्यकता आहे.

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही परिसरात घरांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी खाली येतील. पण जेथे मागणी अधिक व पुरवठा कमी आहे, अशा ठिकाणी किमती खाली येण्याची शक्यता नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. काही विकासकांना रेडी रेकनरपेक्षाही कमी दरात विकायची असून त्यासाठी प्राप्तिकर कायद्यात बदल करावा लागणार असून तशी शिफारस केंद्राकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

बांधकाम उद्योगासाठी तातडीने कुठल्या उपाययोजना केंद्राने जारी करणे आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर आराखडा केंद्रीय गृहनिर्माण विभागाला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये वस्तू व सेवा करात ५० टक्के कपात, कर्जाची पुनर्रचना, व्याजदरात कपात, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सहा महिन्यांपर्यंत सवलत, रेडी रेकनरपेक्षा १० नव्हे तर ३० टक्के कमी दराने घर विक्रीसाठी अनुमती तसेच मजुरांचे पुनर्वसन आदींचा समावेश असल्याचेही डॉ. हिरानंदानी यांनी सांगितले.