‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ म्हणजेच ‘आयसिस’मध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या मालवणीतील चार युवकांपैकी दोघे घरी आले आहेत. अन्य दोघांपैकी एक काबूलला गेल्याची नोंद मिळाली आहे, तर दुसरा अद्याप भारतातच असल्याची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळाली आहे. काबूलपर्यंत पोहोचलेल्या युवकाचा माग घेतला जात आहे. हा युवक आयसिसमध्ये सामील झाला आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मालवणीतील अयाझ सुलतान, वाजिद शेख, मोहसीन सय्यद, नूर शेख हे चार युवक गायब झाले आणि ते आयसिसमध्ये सामील होण्यासाठी गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होता. यापैकी वाजिदचा एटीएसच्या पुणे विभागाने माग घेऊन त्याला लातूर येथून ताब्यात घेतले. त्याला मुंबईत पाठविण्यात आले आहे. मालवणीतून गायब झालेला चौथा तरुण नूर शेख हा स्वत:हून घरी परतला आहे. अयाझ आणि मोहसीनचा शोध लागलेला नाही. मात्र अयाझ हा मुंबईतून दिल्ली येथे गेला आणि तेथून तो नोव्हेंबरात काबूलला गेल्याची नोंद एटीएसला आढळली आहे. तो काबूलला पोहोचला का वा तेथून तो कोठे गेला याबाबत गुप्तचर यंत्रणेची मदत घेतली जात आहे. मोहसीन हा भारतातच असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे एटीएसमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुरुवातीला ३० ऑक्टोबर रोजी अयाझ घरातून निघून गेला. आखातामध्ये नोकरी मिळाल्याचे सांगून तो निघाला होता. परंतु प्रत्यक्षात तो आयसिसमुळेच आकर्षित झाला होता आणि वाजिद आणि मोहसीन हे दोघे त्याचे मित्र होते. त्यांना चेन्नईला जाऊन एका एजंटामार्फत पासपोर्ट बनविण्यास अयाझनेच सांगितले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. मात्र या माहितीला दुजोरा मिळू शकलेला नाही. वाजिदची एटीएसकडून चौकशी केली जात असून याबाबत अधिक माहिती सांगण्यास अधिकाऱ्याने नकार दिला. हे सर्व युवक खरोखरच आयसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाले होते का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आम्ही त्याच दिशेने तपास करीत आहोत.
गायब असलेल्या आणखी दोन युवकांचा आम्ही माग काढत आहोत. त्याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही. अयाझ नोव्हेंबरमध्ये काबूलला गेल्याची नोंद मिळाली आहे तर मोहसीन अद्याप भारतातच आहे.
– निकेत कौशिक, महानिरीक्षक, राज्य दहशतवादविरोधी विभाग.