जून महिन्याची अखेर आली तरी पावसाचा पत्ता नसल्याने ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमधील औद्योगिक तसेच घरगुती वसाहतींना पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्याची पातळी सध्या कमालीची खालावली आहे. धरणात मंगळवारअखेर जेमतेम ३० ते ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आह़े
त्यामुळे पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या १४ टक्के पाणीकपात सुरू आहे. अंबरनाथमधील चिखलोली धरणातील पाणीसाठा संपल्याने तेथील रहिवाशांनाही बारवी तसेच उल्हास नदीवरील बॅरेज प्रकल्पातून पर्यायी पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सव्‍‌र्हिस सेंटर्स तसेच बांधकामांना वापरला जाणारा पाणी पुरवठा तोडला जाणार आहे.
गेल्या वर्षी २ जूनपासून सलग अखंडपणे पाऊस पडत होता. त्यामुळे जूनअखेरीस गेल्या वर्षी बारवी धरणात आताच्या तुलनेत तिप्पट जलसाठा होता. यंदा मात्र पावसाने फक्त हजेरी लावून दडी मारल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी ५१ मिटर असून त्यात २५ दशलक्ष घनमिटर इतका जलसाठा आहे.