डेंग्यूमुळे आणखी एक रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. मुलुंडमधील फोर्टिस येथे उपचार घेत असलेल्या ५३ वर्षांच्या रुग्णाचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र त्याबाबत रुग्णालयाकडून पूर्ण माहिती आल्याशिवाय निश्चित सांगता येणार नाही, असे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुलुंड येथे राहणाऱ्या संबंधित रुग्णाला ताप तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने पाच नोव्हेंबर रोजी सारथी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला आधीपासूनच मधुमेह तसेच दम्याचा त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या प्लेटलेट्स कमी होऊ लागल्या. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी त्याला फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती खालावत असल्याने त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले गेले. मात्र तो उपचारांना दाद देत नव्हता. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याबाबत पालिकेला माहिती कळवल्याचे फोर्टिसकडून सांगण्यात आले.
मुंबईत गेल्या आठवडय़ात डेंग्यू संशयित चार मृत्यू झाले होते. मात्र त्यातील दोनच मृत्यू डेंग्यूमुळे झाले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पालिकेच्या आरोग्य विभागानुसार आतापर्यंत डेंग्यूमुळे दहा मृत्यू झाले असून केईएममध्ये बुधवारी झालेला मृत्यू तसेच मुलुंड फोर्टिस येथील शनिवारी झालेला मृत्यू संशयित रुग्णांच्या यादीत आहेत. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डेंग्यूची साथ कमी होत असल्याचा अनुभव आहे. मात्र यावेळी तापमानातील चढउतार व अवकाळी पाऊस यामुळे डेंग्यूची साथ अजूनही कायम आहे.