कुर्ला येथे सोमवारी रात्री धावत्या गाडीतून फेकलेला गुलाल डोळ्यात गेल्यामुळे गाडीतून पडलेल्या जखमींपैकी एस. श्रीनिवास याचा मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. श्रीनिवासचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तो ठाण्याला जाणाऱ्या गाडीतून नव्हे तर सीएसटीकडे जाणाऱ्या गाडीतून प्रवास करीत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सीएसटीहून ठाण्याकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीवर सीएसटीकडे जाणाऱ्या गाडीतून रंग फेकल्यामुळे सहा जण गाडीतून खाली पडले तर उर्वरित दोघे जण किरकोळ जखमी झाले. मात्र ते गाडीतून खाली पडले नव्हते. या दुर्घटनेमध्ये जागीच मृत्यू पावलेला जी. नित्यानंद हा तरुण माटुंगा येथून आपल्या घरी जात होता. तो मरीन इंजिनीअर होता आणि बढतीसाठी आवश्यक असलेली परीक्षा देण्यासाठी सुट्टीवर आला होता. मूळचा तामिळनाडू येथील नित्यानंद चेंबूर येथे एका लॉजवर मित्रांसोबत राहत होता. सोमवारीही मित्रांसोबत क्लास संपवून घरी परत येत होता. डोळ्यात रंग गेल्यावर त्याचा हॅण्डलला धरलेला हात सुटला आणि काही कळायच्या आत तो खाली पडला. त्याच्या पाठोपाठ आणखी काही जण खाली पडले. या अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेल्या कविता परमार यांच्या पायाला जखम झाली होती. पण त्या गाडीतून खाली पडल्या नव्हत्या. तसेच भांडुप येथे राहणारा दिनेश मोरे याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या हाताला पडणाऱ्यांपैकी एक जण आपटला आणि त्यामुळे हात खेचला गेला होता. परमार आणि मोरे यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. या अपघातातील दीपक गायकवाड हा गंभीर जखमी आहे.
मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झालेला श्रीनिवास हा धारावी येथील संजय गांधी नगरमध्ये राहत होता. तो कडिया काम करणारा कारागीर होता. त्या दिवशी तो खारघर येथे काम करून परत घरी चालला होता. हार्बरने तो कुर्ला येथे आला आणि तेथून तो शीव येथे चालला होता. शीव येथे फलाट हा कुर्ला स्थानकातील फलाटाच्या विरुद्ध बाजूला येतो. म्हणजेच श्रीनिवासला उतरण्यासाठी दुसऱ्या बाजूस जाणे आवश्यक होते. असे असताना तो दरवाजात का उभा होता, याचे कारण समजलेले नाही. त्या वेळी गाडीला विशेष गर्दी नव्हती, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मग श्रीनिवास कसा पडला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.