मुंबईमधील कस्तूरबा रुग्णालयात आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून बळींची संख्या १५ वर पोहोचली आहे.
स्वाइन फ्लू नियंत्रणात आल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला असला तरी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईत ४२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे बुधवारी निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईतील आणि बाहेरील रुग्णांची एकूण संख्या ४२९ वर पोहोचली आहे.
स्वाइन फ्लू झालेल्या ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीला २३ फेब्रुवारी रोजी उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी या व्यक्तीचे निधन झाले.
परिणामी मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या बाहेरच्या व्यक्तींची संख्या १४ वर पोहोचली आहे. तर यापूर्वी मुंबईतील एका व्यक्तीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
परिणामी स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १५ वर गेली आहे. मुंबईमध्ये बुधवारी स्वाइन फ्लूचे ३८ रुग्ण आढळले असून त्यापैकी १२ जणांची प्रकृती स्थिर आहे.
स्वाईन फ्लू झालेल्या मुंबई बाहेरच्या चौघांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबईतील आणि बाहेरील अशा उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४२९ वर पोहोचली आहे.