काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर. सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील. त्यांच्यासोबतच गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे तीन कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. टीव्ही ९ मराठीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

कोण आहेत सविता मालपेकर?
सविता मालपेकर या मराठीतल्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मूळशी पॅटर्न, काकस्पर्श या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. तसंच गाढवाचं लग्न या नाटकातली गंगी ही भूमिकाही त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन सृष्टीतील नाटक, रंगमच कामगार, कलाकार यांच्यावर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. या कलाकारांना उभं राहण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने मदत करायचं ठरवलं. १ कोटी २० लाख रुपयांच्या जमलेल्या मदत निधीचे वाटप नियामक मंडळातल्या सदस्यांना डावलून झाल्याने साठपैकी १५ पदाधिकाऱ्यांनी नाराजी नोंदवली होती. यासंदर्भातला ईमेल हा परिषदेचे विश्वस्त शरद पवार, शशी प्रभू, रवी बापट यांना पाठवला होता. या पंधरा जणांमध्ये एक नाव सविता मालपेकरही होतं.