जनित्राला आग लागल्याने मुलुंडच्या रुग्णालयातील कृत्रिम श्वसन यंत्रणा बंद

मुंबई : मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात जनित्राने पेट घेतल्याने १३ रुग्णांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हलविले असून यातील एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. आठ जण गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सोमवारीही एका रुग्णाचा मृत्यू झाला.

सोमवारी शहरात सर्वत्र वीज गेल्याने हाहाकार उडाला होता. रुग्णालयात करोनाचे बहुतांश रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असल्याने जनित्रावर ही सेवा सुरू ठेवावी लागली. मुलुंडच्या अपेक्स रुग्णालयातही जनित्रावरच अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास चालू जनित्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शॉटसर्किट झाले आणि पेट घेतला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांची स्थिती गंभीर झाली. या रुग्णांना तातडीने इतरत्र रुग्णालयात हलविले. यातील गंभीर प्रकृती असलेल्या १२ रुग्णांना फोर्टिसमध्ये तर मिठागर रुग्णालयात चार, प्लाटिनम रुग्णालयात पाच, मुलुंड करोना आरोग्य केंद्रात सहा आणि आस्था रुग्णालयात एक आणि मनीषा रुग्णालयात पाच रुग्णांना दाखल केल्याचे मुलुंडचे सहाय्यक आयुक्त के. बी. गांधी यांनी सांगितले.

अपेक्स रुग्णालयात उपचार घेत असलेले ठाण्याच्या वर्तकनगर येथील पांडुरंग कुलकर्णी (८२) हे कृत्रिम श्वसन यंत्रणेवर होते. वीज गेल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि सोमवारी रात्री साडेदहाला त्यांचा मृत्यू झाला.

फोर्टिसमध्ये दाखल केलेल्यांपैकी वीरेंद्र सिंग (५४) यांचा मृत्यू मंगळवारी झाला. रुग्णालयात दाखल करण्याच्या वेळेस त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले गेले. अनेक अवयव निकामी झाल्यासह हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजता मृत्यू झाला. रुग्णालय सध्या पूर्णपणे रिकामे असून सर्व रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती फोर्टिस रुग्णालय प्रशासनाने दिली.

सोमवारी रात्री जवळपास २८ रुग्ण फोर्टिसमध्ये आणले होते. यातील काहींजण स्थिर होते, तर काही जण गंभीर प्रकृतीचे होते. यातील १३ जणांना रुग्णालयाने दाखल केले. आठ जणांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात आहेत, तर दोन जणांना सामान्य विभागात ठेवले असल्याचे फोर्टिस रुग्णालय प्रशासनाने सांगितले.