पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना भूल देण्यासाठी प्रशासनाने खरेदी केलेल्या यंत्रांबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. इंग्लंडऐवजी चीनमधून भूल यंत्रे खरेदी करून पालिकेला पुरविल्याचे पुढे आले होते. आता मात्र ही यंत्रे पुरवठादाराने चीनऐवजी हरियाणातील गुडगावमधून खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत करण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या उपायुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचा आरोप करीत सदस्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्याच चौकशीची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पालिका रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया यांची संख्या लक्षात घेऊन २०१३ मध्ये प्रशासनाने ५० भूलयंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनाने हे काम युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स या कंपनीला दिले. इंग्लंडमधून खरेदी करण्यात येणाऱ्या या यंत्रांसाठी पालिकेने कंपनीला ६,४२,६०,००० रुपयांचे कंत्राट दिले. प्रत्यक्षात या कंपनीने इंग्लंडमधील २० यंत्रे पालिकेला पुरविली. मात्र कंपनीने पालिकेला पुरविलेली उर्वरित ३० यंत्रे चिनी बनावटीची असल्याचे चौकशीत उघडकीस आले.  बुधवारच्या बैठकीत खुलासा न झाल्यामुळे पुन्हा भूलयंत्र खरेदीवरून वादळी चर्चा झाली.
पालिकेला पुरविण्यात आलेली भूलयंत्रे इंग्लंड अथवा चिनी बनावटीची नसून हरियाणातील गुडगावमध्ये बनवलेली आहेत, असा आरोप भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. या प्रकरण उघडकीस आणणारे मध्यवर्ती खरेदी विभागाचे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांची बदली करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठविण्यात आले आहे. आरोग्य विभागाची सूत्रे हाती असलेले अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली.
भूलयंत्र घोटाळा उघडकीस आणणारे नरेंद्र बडे यांच्या भायखळा येथील कार्यालयावर १४ जुलै रोजी काही गुंडांनी हल्ला केला होता.   हा हल्ला भूलयंत्र खरेदी घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल केल्याचा संशय व्यक्त होत आहे.