मुंबईतील वडाळा भागात एक जुनी दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेची खबर कळताच आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या जवानांना अद्याप ४ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक किराण्याचे दुकान होते, ते यात पूर्णतः गाडले गेले आहे.


आपत्ती व्यवस्थापन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही इमारत कशी कोसळली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. याची चौकशी झाल्यानंतरच याबाबत माहिती कळू शकेल. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी गेल्यावर्षी मुंबईच्या भेंडी बाजार भागात एक ६ मजली इमारत कोसळली होती. यामध्ये ३३ लोकांचा मृत्यू झाला होता. तर १४ लोक गंभीर जखमी झाले होते. यामुळे मुंबईतील अनेक जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.