मालमत्ता कर्जासाठी लागणारे मूल्यांकन प्रमाणपत्र देण्याकरिता तीन हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शासनाच्या सहकार विभागाच्या सहाय्यक रजिस्टॉर रूपा मानकर आणि उषा वळवी यांच्यासह आणखी एका महिला अधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
मानकर आणि वळवी यांच्यासह प्रमुख कारकून असलेल्या आरती भाटकर यांनाही न्यायालयाने दोषी ठरविले. तक्रारदाराने मालमत्ता कर्जासाठी आवश्यक असलेले मूल्यांकन प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक ती सगळी कागदपत्रेही त्यांनी सादर केली होती. असे असतानाही तिन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने तिघींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तिघींनाही तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. न्यायालयाने लाचलुचपत विभागाने केलेला दावा मान्य करीत मानकर, वळवी आणि भाटकर अशा तिघींनाही तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवून एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने तिघींना सुनावला.