भावी पिढी वाचवायची असेल तर समाजाची एकजूट होणे आवश्यक आहे. आपल्या विरोधात जे कारवाया करतात त्यांच्यासाठी आपली एकजूट हे एकमेव उत्तर आहे. आपली एकजूट असेल तर कोणीही काहीही करू शकणार नाही असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. सगळे भारतीय एकवटले तर आपण शत्रूला तोडीस तोड उत्तर देऊ शकतो असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे

मुंबईत २६/११ च्या हल्ल्याच्या दशकपुर्तीनिमित्त एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे विचार मांडले. यावेळी त्यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सगळ्यांनाच आदरांजली वाहिली. एकात्मता ही राष्ट्रशक्ती आहे असेही मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. आपण जर एकमेकांमध्ये भांडलो, एकमेकांमध्ये वाटलो गेलो तर शत्रूचे बळ वाढेल. पण आपण एकत्र राहिलो तर कोणाचाही आपल्याकडे आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही हिंमत होणार नाही.असेही अमिताभ यांनी म्हटले आहे.

जर आपण आज दुसऱ्याच्या किंकाळीकडे दुर्लक्ष करतो आहोत कारण ती आपल्यापैकी कोणाचाही नाही तर उद्या कदाचित आपल्यावरही ती वेळ येईल. आपल्या सगळ्यांना आपल्यातल्या चांगल्या माणसाला घडवायचे आहे. चांगली माणसे एकत्र येऊन चांगल्या समाजाची निर्मिती होईल. आपली एकी हीच आपली ताकद आहे. आपली एकता, आपली समानता ही फक्त दहशतवादाविरोधात लढण्यासाठीच नाही तर आपले राष्ट्र बळकट करण्यासाठी उपयोगी येणार आहे असेही मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या कवितेच्या ओळीही वाचून दाखवल्या.