ओएनजीसीचा (तेल व नैसर्गिक वायू महामंडळ)  कर्मचारी रितुल सैकिया याची उल्फा (आय) गटाच्या अतिरेक्यांनी शनिवारी सकाळी म्यानमार सीमेवर सुटका केली. म्यानमारच्या नागालँड सीमेलगत त्याला सोडण्यात आले. सैकिया याचे २१ एप्रिल रोजी नागालँडमधील लोंगा खेड्यातील सीमेवरून अपहरण करण्यात आले होते.

३१ दिवसांनी त्याची सुटका करण्यात आल्याची माहिती आसाम पोलीस मुख्यालयाने दिली आहे. म्यानमार लगतच्या सीमेवर सकाळी सात वाजता त्याची सुटका करण्यात आली.

सैकिया याला लष्कराने मोन येथील पोलीस ठाण्यात दाखल केले. या वेळी आसाम पोलिसांचे पथकही हजर होते. त्याला नंतर घरी सोडण्यात आले. तो आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील तिताबार येथील आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या सुटकेनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले, की सर्वांच्या सहकार्यातून शांतता व विकासाचे नवे पर्व सुरू होईल.  सुटकेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

तेल व नैसर्गिक वायू मंडळाच्या तीन कर्मचाऱ्यांचे २१ एप्रिल रोजी उल्फा (आय) गटाने अपहरण केले होते. शिवसागर  जिल्ह्यातील लकवा येथील तेलक्षेत्राच्या ठिकाणाहून  त्यांचे अपहरण केले होते. मोहिनी मोहन गोगोई व अलाकेश सैकिया या दोन कर्मचाऱ्यांची २४ एप्रिलला सुटका करण्यात आली.  सरमा यांनी  रितुल सैकिया याच्या घरी १८ मे रोजी भेट देऊन त्याच्या पत्नी व आईवडिलांना त्याच्या सुटकेचे आश्वासन दिले होते. उल्फा (आय) चा प्रमुख परेश बरुआ याने तो त्यांच्या गटाच्या ताब्यात असल्याचे म्हटले होते. २० मे रोजी सरमा यांनी बरूआ याला या कर्मचाऱ्याची सुटका करण्याचे आवाहन केले होते.