कांदा साठवणुकीवरील निर्बंध उठविण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली कांदा लिलावाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी गुरूवारी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा निघाल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून पुन्हा कांद्यावर निर्बंध लादणे या केंद्र सरकारच्या परस्परविरोधी भूमिके मुळे शेतकरी आणि व्यापारी त्रस्त आहेत. कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्राने लहान व्यापाऱ्यांना दोन, तर मोठय़ा व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन साठवणूक मर्यादा घातली आहे. या निकषामुळे काम करणे अवघड झाल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी लिलावातून अंग काढून घेतले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प  आहेत.

या प्रश्नावर कांदा व्यापारी, उत्पादक आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री छगन भुजबळ तसेच कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच सणासुदीत कांद्याचे भाव वाढू नयेत, यासाठी के ंद्राने कांदा साठवणुकीची मर्यादा घातली आहे. मात्र, या मर्यादेत कांदा खेरदी करणे शक्य नाही. एक शेतकरी एकाचवेळी २५ टनापेक्षा अधिक कांदा बाजारात आणतो. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण होत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. राज्य आणि केंद्राच्या भांडणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर साठवणुकीवरील निर्बंध हटविण्यासाठी शुक्रवारी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली. तसेच या प्रश्नावर सरकार शेतकऱ्यांबरोबर असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लिलाव बंदी मागे घेण्याची घोषणा व्यापाऱ्यांनी केली. त्यानुसार शुक्रवारपासून सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी-लिलाव सुरू होतील, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.