कांद्याची साठेबाजी करणारे व्यापारी व दलाल हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढलेल्या किंमतीचा काहीही फायदा मिळत नसून ग्राहकांची मात्र लूट होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात अधिक पाऊस झाल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे दरवाढ होणार, हे गृहीत धरून आधीच आयातीचे नियोजन करायला हवे होते. देशाचे कृषिमंत्री शरद पवार हे जागतिक पातळीवरील ‘कृषीतज्ज्ञ’ असताना त्यांनी यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना आधी का दिल्या नाहीत, असा सवाल भांडारी यांनी केला. शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत दिल्याने लासलगावला काहींनी दोन दिवसांपूर्वी कांदा परत नेला. त्यामुळे कांद्याची उपलब्धता असून व्यापारी व दलाल साठेबाजी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच नाही, असे त्यांनी सांगितले.