मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना होणारी कांद्याची आवक गुरुवारी अचानक निम्म्यावर आल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशीतील घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या कांद्याचे दर किलोमागे २५ रुपयांपर्यंत पोहोचले. राज्यभर पावसाने दडी मारल्यामुळे नव्या कांद्याचे पीक घेण्यास यंदा उशीरा होण्याची शक्यता असून उन्हाळी कांद्याची आवकही घटल्याने किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या दराने आतापासूनच तिशीचा टप्पा ओलांडला आहे. पुढील तीन महिने कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणेल, असेच काहीसे चित्र आता दिसू लागले आहे.
नाशिक जिल्ह्य़ात एप्रिल तसेच मे महिन्याच्या मध्यावर निघणारे उन्हाळी कांद्याचे पीक गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही घटल्यामुळे दोन आठवडय़ांपासून मुंबई तसेच आसपासच्या परिसराला होणारी कांद्याची आवक कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात वाशीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर २२ रुपयांपर्यत पोहोचले होते.  
मुंबई परिसरातील दर आटोक्यात रहाण्यासाठी दररोज १०० गाडी कांद्याची आवक आवश्यक असते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कांद्याची आवक जेमतेम ७० गाडय़ांपर्यंत खाली आल्यामुळे किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर गुरुवारी दुपारी २४ ते २५ रुपयांपर्यत पोहोचले आहेत, अशी माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
कांद्याचे नवे पीक साधारणपणे सप्टेबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात येत असते. तोवर उन्हाळी कांद्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने अनेक भागांमध्ये नवे पीक घेण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही, असे रामाणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, घाऊक बाजारात आवक होत असलेल्या कमी दर्जाच्या कांद्याचे दरही १६ ते १८ रुपयांच्या घरात असून दुय्यम दर्जाचा कांदा विकत घेण्यासाठी किरकोळ बाजारात २५ रुपये मोजावे लागतील, असेच चित्र आहे. सुका आणि उत्तम प्रतीचा कांदा ३० ते ३२ रुपयांनी विकला जात असून पुढील काही दिवस तरी हे चित्र कायम राहण्याची भीती बाजार आवारात व्यक्त होत आहे.