News Flash

ऑनलाइन फसवणुकीचे पैसे बँकेकडून परत

मुलुंडमधील व्यावसायिकाला एक कोटीला ऑनलाईन गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच पवई येथेही अशाच पद्धतीने सुमारे चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने

| February 3, 2013 02:32 am

मुलुंडमधील व्यावसायिकाला एक कोटीला ऑनलाईन गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच पवई येथेही अशाच पद्धतीने सुमारे चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित बँकेने फसवणूक झालेली रक्कम परत केली होती. त्यामुळे विश्वासार्ह अशा ‘आरटीजीएस’प्रणालीचा बँक कर्मचारी तर गैरवापर करीत नाहीत ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.
चेंबूर येथे राहणाऱ्या प्रभाकर भगत यांचा कस्टम क्लिअरिंगचा व्यवसाय आहे. मे. प्रसंमज्योत शिपिंग लाईन प्रा. लि. या कंपनीचे पवई येथे कार्यालय असून मरोळ येथील युनियन बँक ऑफ इंडियात खाते आहे. ते संपूर्ण आर्थिक व्यवहार ऑनलाईन करीत असत. १८ ते २१ ऑगस्ट २०१२ रोजी ते मुंबईबाहेर गेले होते. घरी परतले तेव्हा त्यांचा मोबाइल अचानक बंद झाला. त्यामुळे त्यांनी एअरटेल कंपनीकडे चौकशी केली तेव्हा सिमकार्ड बंद झाल्याचे सांगितले. मोबाइल क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी नव्याने कागदपत्रे सादर करण्यास सांगितली. त्यानंतर नवीन सिम कार्ड जारी झाले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यातून चार लाख ३४ हजार राज प्रताप गुप्ता या नावे वळते झाल्याचे त्यांच्या लेखापालांनी सांगितले. आपण असे व्यवहार मोबाइल बँकिंगद्वारे करतो. परंतु अशा सूचना बँकेला दिलेल्या नसताही आरटीजीएसद्वारे पैसे वळविण्यात आले होते. त्यामुळे भगत यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या मरोळ शाखा व्यवस्थापक सतीश कुमार यांच्याशी संपर्क साधला. ही रक्कम गुप्ता नावाच्या इसमाच्या कांदिवली येथील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या खात्यावर वळती झाली होती. गुप्ता याला भगत यांचा क्रमांक एअरटेल कंपनीने उपलब्ध करून दिला होता. त्यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे भगत यांच्या नावे असली तरी तो बनावट होती.
या प्रकरणी पवई पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र तेव्हा फारसे काही होऊ शकले नाही. न्यायालयाने आदेश देताच ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने भगत यांचे चार लाख नऊ हजार रुपये परत केले. संबंधित बँक तसेच एअरटेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय ऑनलाइन फसवणूक होऊ शकत नाही, असा आरोप भगत यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 2:32 am

Web Title: online cheating money returned by bank
Next Stories
1 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंडळाची समुपदेशन सुविधा
2 शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात शिक्षक-पालकांचा ‘एल्गार’
3 एसटी कामगारांना पगारवाढ
Just Now!
X