ऑनलाइन तक्रार सुविधेमुळे शोधाचे प्रमाण दुपटीने वाढले

वाहन चोरून त्याची तुकडय़ा तुकडय़ात वासलात लावण्याचा किंवा पररज्यात पाठवणी करून विक्री करण्याचा चोरांचा हातखंडा आता लवकरच पूर्णपणे निष्प्रभ ठरणार आहे. मालकाला आपले चोरीला गेलेले वाहन परत मिळण्याची अधिक हमी देणारी पोलिसांची ऑनलाइन सुविधा सुरू झाली आहे. वाहनचोरीच्या तक्रारीसाठी पोलिसांनी मे महिन्याअखेरीस सुरू केलेल्या ऑनलाईन सुविधेमुळे गेल्या दोन महिन्यांत चोरीला गेलेली दुपटीहून अधिक वाहने शोधून काढण्यात आली आहेत. या सुविधेचा वापर अधिक होईल, तसे वाहनचोरांना लगाम बसविणे शक्य होईल.

गेल्या दोन महिन्यांत दाखल झालेल्या ५४३९ वाहनचोरींच्या तक्रारींपैकी ३७३० वाहने पोलिसांनी शोधून काढली आहेत. ही टक्केवारी तब्बल ६७ टक्के आहे.  वाहन चोरीनंतर ते तातडीने राज्याबाहेर नेण्यात येत असल्याने अशा वाहनांचा तपास लागण्याचे प्रमाण किमान २० टक्के ते ३० टक्के होते. मुंबईतही वाहनचोरींच्या तपासाची टक्केवारी ३० टक्क्यांपलीकडे कधीही गेलेली नाही. तपास लागत नसल्याने वाहनचोरीकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पोलिसांमध्ये बळावली होती. त्यावर तोडगा म्हणून तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या सूचनेनुसार वाहनचोरीबाबत ऑनलाइन तक्रारीची सुविधा २७ मे २०१६ पासून सुरू करण्यात आली.

 ‘पोलीस मित्र’, ‘प्रतिसाद’ पसंतीस

नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने काम करावे यासाठी पोलिसांतर्फे ‘पोलीस मित्र’ आणि ‘प्रतिसाद’ हे दोन अ‍ॅप नागरिकांसाठी सुरू करण्यात आले.   शहरी आणि निमशहरी भागात  त्यांना मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

वाहनमालकांनो हे लक्षात घ्या!

महाराष्ट्र पोलीस दलाच्या संकेतस्थळावर जाऊन वाहनचोरीची तक्रार करता येते. वाहनचोरी झाल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिल्यास त्याचा शोध घेणे निश्चितच शक्य होईल, असा विश्वास  पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्या वाहनांची माहितीही गोळा करण्यात येत असून, या माहितीसंग्रहाच्या मदतीने पोलिसांना सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, असे नियोजन सुरू आहे.