मुंबई : वैद्यकीय निष्काळजीपणाविरोधात आता ऑनलाइन दाद मागणे शक्य होणार आहे. डॉक्टरांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने ही ऑनलाइन सुविधा परिषदेच्या संकेतस्थळावर सुरू केली आहे.

रूग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून होणारे दुर्लक्ष किंवा आर्थिक लुबाडणूक याविरोधात अनेक तक्रारी राज्य वैद्यकीय परिषदेकडे प्रलंबित आहेत. वेळेत न्याय मिळत नसल्याने रूग्णही कंटाळून तक्रारींचा पाठपुरावा करणे सोडून देतात.

रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी परिषदेने ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा बुधवारपासून सुरू केली.

परिषदेच्या संकेतस्थळावरच ही सुविधा उपलब्ध असून यासाठी रूग्ण किंवा डॉक्टरांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

या सुविधेमुळे तक्रारीचा पाठपुरावा करणे रूग्ण आणि डॉक्टरांनाही सहज शक्य होईल. तक्रारीवर खुलासा करणारे कागदपत्र ऑनलाइन सादर करण्याची मुभा डॉक्टरांना असेल. यामुळे तक्रारींचे वेळेत निवारण करण्याची पद्धत विकसित होईल, तसेच राज्यभरात कुठूनही तक्रार करणे शक्य होईल, असे वैद्यकीय परिषदेने स्पष्ट केले आहे.

जुन्या तक्रारीही दाखल करण्याची मुभा

नव्या तक्रारींसोबतच जुन्या तक्रारीही रूग्णांना या पोर्टलवर दाखल करता येतील. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याचा पाठपुरावा करणे तक्रारदाराला सोपे जाईल, असे राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले