शासनाने ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशी मोहीम राबवली असली तरी आता प्रत्यक्षात घरोघरी ‘शाळा बंद, समस्या सुरू’ अशी परिस्थिती दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून घरी अडकलेल्या मुलांना मिळणारे उपक्रम, शिक्षण, शिबिरे यांचे ऑनलाइन पर्याय अपुरे ठरू लागले आहेत. लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, भीती या समस्या ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे निरीक्षण समुपदेशक, बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले.

मार्च महिन्यापासून मुले घरातच अडकली आहेत. टाळेबंदीच्या आरंभीच्या काळातील कौटुंबिक एकत्रीकरणाचे सोहळे आता आटले आहेत. शाळा, क्रीडांगणे, खेळघरे बंद या परिस्थितीमुळे आता मुलांमधील शारीरिक आणि मानसिक समस्या वाढीला लागल्या आहेत. विशेषत: चिडचिडेपणा आणि भीती वाढल्याच्या तक्रारी सर्वाधिक येत असल्याचे समुपदेशकांनी सांगितले. त्याबरोबर सद्य:स्थितीत व्यायामाचा अभाव, शाळा ऑनलाइन असल्यामुळे मर्यादित होत असलेल्या शारीरिक हालचाली यांमुळे मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.

आत्मविश्वास उणावला..

घरात करोनाबाबत होणाऱ्या चर्चा, जवळच्या व्यक्तीचा प्रादुर्भाव किंवा निधनाबाबतच्या चर्चा यामुळे लहान वयोगटातील मुलांमधील भीती वाढली आहे. मानसिक कारणांमुळे डोकेदुखी, पोटदुखी, झोपेत लघवी होणे या समस्या दिसत आहेत.

शाळा ही फक्त शिक्षण देत नाही, इतर मुलांबरोबर मिसळणे हादेखील शाळेतील महत्त्वाचा घटक असतो. सध्या ते बंद झाल्यामुळे ती बुजरी होत आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होत आहे.

दिवसा उजेड आणि रात्री अंधार हे शरीराला अपेक्षित असणारे चक्र घरोघरी बदलले आहे. मुले रात्री उशिरापर्यंत जागी असतात. त्यामुळे दिनचर्येतही बदल झाला आहे. सकाळी काही वेळ मुलांना ऊन मिळणे, त्यांचा वावर स्वच्छ उजेडात होणे आवश्यक असते. सध्या हे बंद झाल्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या दिसू लागल्या आहेत. मात्र, घराबाहेरील खाणे बंद झाल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण काहीसे घटल्याचे दिसत आहे.

– डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

धक्कादायक..

मुंबईतील काही शाळांमधील साधारण १ हजार १४१ विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात ७० टक्के विद्यार्थ्यांनी चिडचिडेपणा, डोकेदुखी, भूक न लागणे, वारंवार रडू येणे, मान व पाठदुखी, झोप न लागणे, कशातच मन न लागणे, भीती वाटणे, एकाकी वाटणे, अपचन यांपैकी समस्या जाणवत असल्याचे सांगितले. सर्वाधिक म्हणजे १४.१ टक्के विद्यार्थ्यांनी चिडचिड होत असल्याचे सांगितले. शिक्षक असलेल्या जयवंत कुलकर्णी यांनी हे सर्वेक्षण केले होते.

चॅटिंग वाढले

मुलांच्या उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग नाही, तेथे मुलांमधील चिडचिडेपणा वाढला आहे. ज्या मुलांना थोडय़ा प्रमाणात घराबाहेर पडता येते त्यांच्यात चिडचिडेपणा कमी आहे. काही प्रमाणात ग्रामीण भागांत मुले कमी कंटाळलेली दिसतात. वाढत्या वयातील मुलांचे म्हणजे साधारणपणे १४ पासून पुढील वयोगटातील मुलांमधील प्रश्न अधिक वाढले आहेत. ही मुले काही वेळा सगळे पालकांशी बोलत नाहीत. समाजमाध्यमांवर या वयोगटातील मुलांचे चॅटिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण कुणाशी बोलतो, कोणत्या गोष्टी सांगतो याची समज या वयोगटात कमी असते. पालकांनाही सर्व गोष्टी नियंत्रित करणे शक्य नसते. त्यातून नव्या समस्या निर्माण होत आहेत, असे समुपदेशक डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले.

एकलकोंडेपणा..

शाळा बंद असल्यामुळे मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी झाली आहेत. मुलांमधील ऊर्जेला सध्याच्या परिस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. खेळण्यासाठीच्या जागा नसल्यामुळे आणि अनेक घरांमध्ये भीतीपोटी मुलांना सोसायटीच्या आवारातही फिरण्यास किंवा खेळण्यास मनाई करण्यात येते. चिडचिडेपणा वाढला असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.