करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात टाळेबंदी असल्याने महावितरणच्या घरगुती व इतर वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे. मार्च महिन्यात या ७३ लाख ग्राहकांनी १२२७ कोटी २५ लाख रुपये ऑनलाइन प्रणालीद्वारे भरले. एरवी सरासरी ६५ लाख ग्राहक ऑनलाइन वीजबिल भरतात. करोनामुळे ती संख्या मार्चमध्ये आठ लाखांनी वाढली.

राज्यामध्ये करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून महावितरणचे वीजबिल भरणा

केंद्रही बंद करण्यात आले. त्यामुळे लाखो ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरले. मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला. पुणे परिमंडळात १३.५० लाख ग्राहकांनी २६६.२९ कोटी रुपये, भांडुपमध्ये १०.९९ लाख ग्राहकांनी २३३.६० कोटी रुपये, कल्याणमध्ये १०.२५ लाख ग्राहकांनी १६४.३९ कोटी रुपये, नाशिकमध्ये ५.६५ लाख ग्राहकांनी ९४.४१ कोटी रुपये, बारामतीमध्ये ५.६३ लाख ग्राहकांनी ७१.०९ कोटी, कोल्हापूरमध्ये ४.२२ लाख ग्राहकांनी ८४.९६ कोटी रुपये, नागपूरमध्ये ४.०५ लाख ग्राहकांनी ७०.७५ कोटी रुपये, जळगावमध्ये ३.२५ लाख ग्राहकांनी ४७.८७ कोटी रुपये, औरंगाबादमध्ये २.३० लाख ग्राहकांनी ४३.७५ कोटी रुपये, अकोला २.२७ लाख ग्राहकांनी २७.१० कोटी रुपये, अमरावती २.२१ लाख ग्राहकांनी २३.४८ कोटी रुपये, लातूरमध्ये १.९२ लाख ग्राहकांनी २५.५३ कोटी रुपयांची, कोकण १.८८ लाख ग्राहकांनी २२.९२ कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये १.७९ लाख ग्राहकांनी १५.३६ कोटी रुपये, गोंदियामध्ये १.७९ लाख ग्राहकांनी १२.८२ कोटी रुपये, नांदेड परिमंडळात १.५८ लाख ग्राहकांनी २२.९१ कोटी रुपये ऑनलाइनद्वारे भरल्याचे महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाइल अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. त्यात एकाच खात्यातून ग्राहकांना स्वत:च्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करणे शक्य झाले आहे. त्यासाठी नेटबॅंकिं ग,  क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाइल वॅलेट व कॅश कार्डद्वारे वीजबिल भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या बिलाच्या पावतीचा तपशीलही उपलब्ध आहे.