25 September 2020

News Flash

बारावीला महाविद्यालय बदलाची ऑनलाइन नोंदणी

मुख्याध्यापकांच्या मते या प्रक्रियेला उशीर होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बदलासाठी कारण देणे सक्तीचे; योग्य कारणाशिवाय प्रवेश नाही

अकरावीला मनासारखे महाविद्यालय न मिळाल्याने बारावीला महाविद्यालय बदलण्याचे प्रकार वाढीस लागल्याच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या वर्षीपासून बारावीला महाविद्यालय बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर, बदलाचे कारणही त्यांना तेथे नोंदवावे लागणार असून योग्य कारण असल्याखेरीज या बदलास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. परंतु महाविद्यालय बदलण्याचे कारण योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी कोणते निकष वापरले जाणार, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

प्रवेश प्रक्रियेतील शिक्षण संस्थांच्या मनमानीला आणि पारदर्शकता आणण्याकरिता अकरावीकरिता राज्यच नव्हे तर इनहाऊस, संस्थात्मक आणि अल्पसंख्याक कोटय़ात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी गेल्या वर्षीपासून सक्तीची करण्यात आली. आता याच पद्धतीने बारावीचेही प्रवेश करण्यात येणार आहे. अकरावीला मनाजोगे महाविद्यालय न मिळाल्यामुळे बारावीला महाविद्यालय बदलण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यातही बऱ्यापैकी गैरप्रकाराला वाव असतो. परिणामी ही प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन करण्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. या प्रवेश प्रक्रियेत होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी महाविद्यालय बदलण्याचे कारण योग्य असेल तरच विद्यार्थी बारावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असतील, असा निर्णय मुंबई शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मते या प्रक्रियेला उशीर होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.

आपल्याला हवे ते महाविद्यालय मिळवण्यासाठी विद्यार्थी अकरावीचे महाविद्यालय सोडत असतील तर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला काही अर्थच उरत नाही. महाविद्यालयाची बसलेली घडी बिघडू नये, यासाठी महाविद्यालय बदलीचे कारण व्यवहार्य वाटत असेल तरच बदलण्यासाठीची मुभा देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. ‘बारावी प्रवेश पद्धती ऑनलाइन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ते कसे करावे, यावर विचार सुरू आहे. पण लवकरच ही प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ असे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

अकरावीनंतर महाविद्यालय बदलण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी मुलांना खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. त्यांचे शुल्क त्याला परवडत नाही. अशा वेळेस त्याला सरकार अनुदानित महाविद्यालयामध्ये जाण्याची इच्छा असेल तर त्याची अडवणूक करणे चुकीचे आहे. त्यामुळे बदलीचे कारण योग्य आहे की नाही हे कसे ठरवणार, असा प्रश्न डहाणूकर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी पेठे यांनी उपस्थित केला.

या कारणांसाठी बदल शक्य

  • महाविद्यालय घरापासून लांब असणे
  • पालकांची नोकरीतून बदली
  • शाखा बदलणे

बारावीची प्रवेश प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा मार्ग योग्य आहे. परंतु आता मे महिना सुरू झाला आहे. जूनमध्ये महाविद्यालये सुरू होतील. इतक्या कमी कालावधीत ही प्रक्रिया राबविणे अवघड आहे. वेळेत प्रवेश प्रक्रिया न झाल्यास मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. महाविद्यालयांना आणि पालकांना या प्रवेश प्रक्रियेबाबतची आगाऊ सूचना देणे गरजेचे होते.

प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:54 am

Web Title: online enrollment college changes in 12th
Next Stories
1 विद्यापीठाच्या अधिसभेचे पात्रता निकष जाहीर
2 आता भारनियमनाचेही चटके
3 कोयना वीजनिर्मिती आणि महागडी खासगी वीज खरेदी बंद केल्याने फटका
Just Now!
X