गूगल पे, भारत पे वापरकर्त्यांच्या खात्यावर भामटय़ांचा डल्ला

मुंबई : ‘ओएलएक्स’सारख्या संकेतस्थळावरील खरेदी-विक्री व्यवहाराच्या निमित्ताने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत अचानक वाढले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांश गूगल पे, भारत पे अ‍ॅप वापरणारे आहेत. व्यवहार झटपट व्हावेत या उद्देशाने सुरू केलेली सोय (प्री अ‍ॅप्रुव्हल लिंक) किंवा त्याबाबतचे अज्ञान वापरकर्त्यांचा घात करते, असे सायबरतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

पवई आणि मरिन ड्राइव्ह परिसरातील तीन सुशिक्षितांना २९ जुलैला ‘प्री अ‍ॅप्रुव्हल लिंक’ पाठवून फसवण्यात आले. या तिन्ही प्रकरणांत फसवणूक झालेल्यांनी आपल्या वस्तू विकण्यासाठी ‘ओएलएक्स’वर जाहिरात केली होती. त्या खरेदी करण्याच्या निमित्ताने ग्राहकांच्या वेशात भामटय़ांनी त्यांच्याशी संपर्क साधला. गूगल पे अ‍ॅप वापरता का, अशी विचारणा केली. त्यांच्या मोबाइलवर भारत पे अ‍ॅपशी संबंधित दोन लिंकही पाठवल्या. त्या उघडून ‘पे’ पर्याय निवडताच तिघांच्या खात्यांतून पैसे वळते झाले. प्रत्यक्षात या तिघांना त्यांच्या वस्तू विकायच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे यायला हवे होते. मात्र पैसे खरेदी करणाऱ्यांच्याच खात्यात गेले. विशेष म्हणजे यातील दोघांनी गूगल पे अ‍ॅप वापरणाऱ्या ओळखीतल्या दोघांतर्फे हे व्यवहार केले.

सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार या लिंक म्हणजे प्री अ‍ॅप्रुव्हल म्हणजेच आपल्या खात्यातून अन्य खात्यात पैसे वळवण्याची संमती असते. व्यवहार चटकन व्हावेत यासाठी संबंधित अ‍ॅप तयार करणाऱ्या कंपन्यांनी केलेली ही सोय. पण ही संमती आहे आणि या लिंकवर माहिती दिल्यास किंवा ‘पे’ पर्याय निवडल्यास पैसे वळते होतात, याची माहिती वापरकर्त्यांपैकी अनेकांना नसते.

फसवणूक टाळण्यासाठी : प्रत्यक्षात एखादी वस्तू खरेदी करताना किंवा विकताना जो चोखंदळपणा, व्यावहारिकपणा असतो तोच ऑनलाइन व्यवहारांमध्येही असणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष भेटून, खरेदी-विक्रीनंतर करावेत. वस्तू विकत घेणाऱ्याने लिंक पाठवल्यास त्यावर कोणतीही माहिती विशेषत: अ‍ॅपवरील खात्याचे तपशील देऊ नयेत. त्या लिंकवर पैशांची मागणी होत असेल तर हा व्यवहार टाळावा, असा सल्ला अ‍ॅड. प्रशांत यांनी दिला.