जयेश शिरसाट

अनोळखी खात्यांवर परस्पर वळती झालेली रक्कम रोखून धरण्याचे पोलीस यंत्रणेचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामटय़ांनी नवी शक्कल लढवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकांच्या कामकाजाचे दिवस आणि कार्यालयीन वेळा टाळून होणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब लक्षात येताच ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे तपासताना महत्त्वाचे तपशील पुरवणारी बँकांची मध्यवर्ती यंत्रणा (नोडल अधिकारी) २४ तास सुरू असावी, यासाठी गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

फसवणूक झालेल्या व्यक्तीचे खाते कोणत्या बँकेत आहे, ही माहिती घेऊन पोलीस त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून घडलेल्या गुन्ह्य़ाची माहिती देतात. नंतर नोडल अधिकाऱ्यास ईमेलद्वारे फौजदारी दंड संहितेतील तरतुदीनुसार तपासासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत नोटीस बजावतात. फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या खात्यावरून रक्कम कोणत्या बँकेत किंवा वॉलेटमध्ये वळविण्यात आली त्याची माहिती घेऊन संबंधित संस्थांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खाती गोठविण्याबाबत सूचना दिली जाते. मात्र, ही कार्यपद्धती चोरांच्या लक्षात आली असून त्यामुळे कार्यालयीन वेळा टाळून होणाऱ्या गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले आहे, असे सायबर पोलिसांनी सांगितले.

गुन्हेगारांची बदलती कार्यपद्धती

केवायसी अपडेट न केल्यास क्रेडिट-डेबिट कार्ड, सीम कार्ड, गुगल पे खाते बंद होईल, अशी भीती दाखवणारे फसवे लघुसंदेश दिवसा कधीही ग्राहकांना मिळतात. या लघुसंदेशांत संपर्कासाठी एक क्रमांक दिलेला असतो. त्यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधल्यास समोरून बोलणारी व्यक्ती आम्ही संपर्क साधू, असे सांगते. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर संपर्क साधला जातो.

होते काय?

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची माहिती त्वरित मिळाल्यास चोरी झालेली रक्कम ज्या खात्यांत जमा होते ते खाते गोठवले जाते. या कारवाईत बँकांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांचे वेगवान सहकार्य सायबर पोलिसांना मिळते. मात्र, मुंबईत हे अधिकारी कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत काम करतात. त्यामुळे त्यानंतरच्या वेळेत गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना मिळूनही उपयोग होत नाही.

पूर्ण वेळ नोडल अधिकाऱ्यांची मागणी

गेल्या वर्षी गुजरात पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‘आश्वस्त’ ही २४ तास सेवा पुरवणारी हेल्पलाइन सुरू केली. या उपक्र मात पोलिसांना बँकांचे २४ तास सहकार्य मिळते आहे. त्याप्रमाणे मुंबईतील बँक मुख्यालयांनी २४ तास नोडल अधिकारी उपलब्ध करावेत, यासाठी सायबर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर प्रयत्नशील आहेत.

फसवणूक लवकर लक्षात येणे महत्त्वाचे..

अलीकडेच एका धातू व्यावसायिकाच्या बँक खात्यातून परस्पर १२ लाख रुपये भामटय़ांनी वळते केले होते. व्यावसायिकाच्या मोबाइलवर या व्यवहाराचे लघुसंदेश मिळताच त्याने त्वरित सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाचे खाते असलेल्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधला तेव्हा ही रक्कम चार विविध बँकांमध्ये वळती झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या सूचनेवरून या पैकी सुमारे दहा लाख रुपये वळते झालेली खाती गोठवण्यात आली. एक खाते गोठवण्यापूर्वीच त्यावर जमा झालेले अडीच लाख रुपये भामटय़ांनी काढले.