18 June 2019

News Flash

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू

मराठा विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र सादर करण्यास मुभा

मराठा विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र सादर करण्यास मुभा

राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात सोमवारपासून (२७ मे) होत असून मराठा विद्यार्थ्यांना यंदापासून आरक्षण मिळणार आहे. जात प्रमाणपत्र नसलेल्या मराठा विद्यार्थ्यांना पालकांचे हमीपत्र देण्याची मुभा प्रवेश समितीने दिली आहे. आरक्षणाच्या नव्या तरतुदींनंतर अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये खुल्या गटासाठी ३५ टक्के, तर  बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयांत खुल्या गटासाठी ७ टक्के जागा उपलब्ध आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला असून या टप्प्यांत विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग म्हणजेच वैयक्तिक माहिती भरू शकतात. यंदा अकरावीलाही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू होणार आहे. मराठा विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास पालकांच्या हमीपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज मंजूर करण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी राखीव जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नॉन क्रिमीलेअर’ प्रमाणपत्र द्यावे लागेल. यंदा आरक्षणाच्या नव्याने लागू झालेल्या तरतुदींनुसार खुल्या गटातील आणि संस्थांतर्गत कोटय़ातील जागांमध्ये घट झाली आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये खुल्या गटासाठी ३५ टक्के तर बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये खुल्या गटासाठी ७ टक्के जागा उपलब्ध असतील. संस्थांतर्गत कोटय़ासाठी १० टक्के जागा राखीव असतील.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्याची मुभा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी पहिला भाग भरण्यासाठी माहितीपुस्तक घेणे आवश्यक असून ते त्यांना शाळेत मिळू शकेल. विद्यार्थी किमान १ आणि कमाल १० महाविद्यालयांचे पर्याय देऊ शकतील. पहिल्या प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा लागेल, अन्यथा त्यांना नियमित फेऱ्यांमधून वगळण्यात येईल. मात्र प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर होणाऱ्या प्रवेश फेरीत हे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. एका अर्जावर एकाच शाखेतील प्रवेश घेता येईल. मात्र शाखा बदलायची असल्यास अर्जाचा दुसरा भाग नव्याने भरता येईल.

नियमित तीन फेऱ्या

प्रवेश प्रक्रियेची पहिली शून्य फेरी होईल. या फेरीत संस्थांतर्गत, व्यवस्थापन कोटा आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील प्रवेश महाविद्यालयाच्या स्तरावर होतील. त्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमधून राहिलेल्या, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष फेरी होईल आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर एक प्रवेश फेरी घेण्यात येईल.

आरक्षण असे..

  • बिगर अल्पसंख्याक महाविद्यालये
  • पूर्वीप्रमाणे असलेली सामाजिक आरक्षणे – ५२ टक्के
  • सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (मराठी) – १६ टक्के
  • आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक – १० टक्के
  • अल्पसंख्याक महाविद्यालये
  • अल्पसंख्याक विद्यार्थी – ५० टक्के
  • व्यवस्थापन कोटा – ५ टक्के
  • संस्थांतर्गत कोटा (असल्यास) – १० टक्के

याशिवाय प्रत्येक गटात समांतर आरक्षण असेल. बदलीने आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पाल्य, खेळाडू यांच्यासाठी ५ टक्के, अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आणि भूकंप आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ५ टक्के असे प्रमाण आहे. अनाथ विद्यार्थ्यांना खुल्या गटातून १ टक्के समांतर आरक्षण देण्यात येईल.

First Published on May 27, 2019 1:14 am

Web Title: online fyjc admission 2019