करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. टाळेबंदीमुळे प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाइन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण १४ ऑनलाइन आभासी (व्हर्च्युअल) रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन मेळाव्यांमध्ये एकूण ११५ उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली १२ हजार ३२२ रिक्तपदे अधिसूचित केली. २५ हजार ०४७ उमेदवारांनी ऑनलाइन भाग घेतला. त्यापैकी एक हजार २११ उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.